राम कृष्ण हरी

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!!
        कोरोनाच्या प्रसारामुळे आज पंढरीची वारी जरी बंद असली तरी वारकऱ्यांच्या मनातील पालखी, वारी, दिंडी कधीच पंढरीच्या पांडुरंगाच्या दरबारात जाऊन पोहचली असेल काही सांगता येत नाही. आज याच वारकरी , आणि प्रत्येक पांडुरंगाच्या भक्तांच्या मनातले भाव व्यक्त करण्याचा एक प्रयत्न या कवितेतून केलाय . कारण लाखो भाविक मग ते बाल, वृद्ध, तरुण-तरुणी या आषाढी एकादशीची वाट पाहत असतात आणि आजच्या या परिस्तितून त्यांना जरी जाता आलं नाही तरी त्यांचं  पांडुरंगावरच प्रेम कमी होणार नाही. कारण देवाशी जुळलेले नाते घट्ट असेल तर कुठूनही हात जोडले तरी त्याच्यापर्यंत तो नमस्कार पोहचलाच जातो. आज जरी इच्छा असली पांडुरंग भेटीची तरी आपल्याला कोरोनासारख्या कालियुगातल्या या  दैत्याला समूळ नष्ट करायचं आहे याचं भान प्रत्येक वारकरी भक्तांना आहे . जरी पंढरपुरात पोहचले नाही तरी पांडुरंगाचे चरण सोडणार नाहीत. जिथे टेकू माथा ते चरण पांडुरंगाचे , करु वंदन ज्यांना ते रूप विठ्ठलाचे. चांगल्या वाईट प्रसंगी पांडुरंगाचे स्मरण प्रत्येक दिवशी घरोघरी होतं. कारण फक्त सण आणि बारसे , बारावे याच दिवशी भजन, कीर्तन ठेवणारा आणि इतर दिवशी कंटाळा समजणारा वारकरी नाहीच कारण वारकऱ्यांच्या घरी सतत विठ्ठल नाम घेतलं जातं, हरी भजन म्हटलं जातं. अभंग, हरिपाठ , जप सतत चालू असतो आणि अशा वारकरी किंवा विठ्ठल भक्तांच्या घरात जन्म झाला तर याशिवाय मोठं भाग्य नाही.
                   संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगात म्हटलं आहे, " घेईन मी जन्म याच साठी देवा तुझी चरण सेवा साधावया".  जन्म मिळतो तो आपल्या कामात गुंतून  विठ्ठलाच्या भक्तीत लीन केला तर जगण्याच्या प्रत्येक गोष्टीत आनंद मिळतो. असल्याच काही अडचणी तरी त्या भक्तीमुळे जगण्याची आशा मिळते. लवकरात लवकर हा कोरोना संसर्ग दूर करून आपल्या भक्तांना पांडुरंग अभय देईल .  अडवून अडवणार तरी किती जरी आज आपण पांडुरंगाच्या दरबारी पोहचलो नाही तरी तो स्वतः आपल्या भेटीसाठी येईल यात काही वाद नाही श्रद्धा असली की देव कोणत्याही रुपात भेटायला येतोच. आपली श्रद्धा तेवढी असली पाहिजे आपल्याला अडवतील मग भजन करण्यापासून असुदेत, किंवा नाव घेण्यापासून किंवा पांडुरंगाच्या दर्शनाला जाण्यापासून जरी अडवतील तर ते आपल्याला शरीराला अडवू शकतील , पण मनाचं काय? असा कुठे बांध नाही जो आपलं मन अडवू शकेल, आणि मन हे एका क्षणात लाखो मैल जातं आणि एवढा वेग नाही कुठल्याच गोष्टीत जे त्याला अडवू शकेल. मी घेतलेला माझा प्रत्येक शब्द त्या पांडुरंगाच्या आठवणीनेच घेतो, चालतानाची प्रत्येक वाट मी त्याच्या सोबतीने चालतो मग जर वेळ आली म्हणून जर शांत असलो तरी म्हणजे माझा पांडुरंग मनातून नाही गेला ना जाणार नाही . जे माझ्या मुखातून येतील शब्द , भजन ,  गीत ते श्री हरी कृपेनेच.
              !! पांडुरंग हरी !!     
                                  ✍️विशाल विकास मराठे
                                         कणकवली- दिगवळे
              
              

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा