बेधुंद पाऊस आणि प्रेमाच्या ओल्याचिंब शब्दसरी

       कोसळणारा पाऊस बेधुंद असावा पण नुकसान करणारा नसावा. कारण त्या पावसाचे प्रत्येकाच्या मनात घर असतं म्हणून तरी त्या पावसाने कोणाच्या घरात शिरायचं नसतं. पावसाचे गोडवे लिहिले जातात, गाणी म्हटली जातात कारण लोकं पावसावर भरपूर प्रेम करतात. अगदी आपल्या हक्काच्या व्यक्तींवर जसं प्रेम असतं तसंच प्रेम या पावसावर प्रत्येक माणसाचं असतं. म्हणून प्रेमाला पावसाची उपमा देणं चुकीचं ठरत नाही. आणि प्रेम म्हटलं की त्याला शब्दांची मर्यादा उरत नाही शब्दात सांगता येत नाही. पावसाळ्यात दिसणारं इंद्रधनुष्य सप्तरंगांच जरी असलं तरी त्या सप्तरंगांकडून आठवण होते ती प्रेमरंगाची. माणूस हा आठवणी जपत असतो . कारण आयुष्यात काही व्यक्ती असणं हेच फार भाग्यचं  वाटू लागतं मग दूर असतानासुद्धा  पावसातील बेभान वाऱ्यासारखं आपलं मन वाट पाहत असतं ती त्यांच्या भेटीची. मनात जरी दुःख असलं तरी पावसात भिजताना डोळ्यातले पाणी त्या पावसात कधी मिसळून जातं समजत नाही . पण प्रेमाची ताकद एवढं बळ देऊन जाते की लाख गोष्टी आपल्या विरुद्ध आपल्याला हरवण्यासाठी जरी असल्या मग ती परिस्थिती असो किंवा कोणी व्यक्ती सगळ्याला सामोरे जाण्याची शक्ती प्रेमामुळे मिळत असते. प्रेमासाठी , काळजीपोटी येणारा एक एक अश्रू कधी वाया जात नसतो. तो समुद्राच्या लाटांसारखा महाकाय होऊ शकतो.  

टिप्पण्या